Click here to go back
स्वामी विवेकानंद
Image of a calender
September 10 , 2021
Logo of a Customer
आदित्य चव्हाण
Swami Vivekananda

स्वामी विवेकानंद हे देशाला लाभलेले एक अनमोल रत्नच होय.स्वामी विवेकानंदांनी केलेली भाषणे, युवक व युवतींसाठी एक अक्षय प्रेरणास्रोतच आहेत. त्यांचे विचार आजही प्रत्येक युवकास प्रेरणादायी आहे.म्हणूनच आज स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे विचार जाणून घेऊयात. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व युवकांना पटवून दिले.पण त्यांची शिक्षणाची व्याख्या ही फक्त पदविपूर्तीच मर्यादित नव्हती तर मानसिक व शारिरीक विकास शिक्षणाद्वारे व्हायला हवा यावर त्यांनी भर दिला.समकालीन कल्पना आणि वेदांत तत्त्वज्ञान यांच्यात मेळ घालून स्वामी विवेकानंदांनी युवकांना संदेश दिला.एक उत्तम चारित्र्य बनवणे हेच मानवाच्या हिताचे आहे असा संदेश त्यांनी युवकांना दिला. भविष्यात प्रगती करायची असेल तर आपल्या भूतकाळाबद्दल आदर असायला हवा. आणि भारतासारख्या प्राचीन संस्कृतीतून तर खूप प्रेरणा घेण्यासारखी आहे. म्हणूनच स्वामीजी संदेश देतात की युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्य घडविले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात,"आपण जे काही आहोत , त्याला आपणच जबाबदार आहोत, आणि आपले जे ध्येय असेल ,ते साध्य करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. आपण जे काही भोगत आहोत ते आपल्या भूतकाळातील कर्मांमुळे आहे, पण जर असे असेल तर आपण वर्तमानात जे चांगले करू त्याचा फायदा भविष्यात नक्की होईल." यातून आपल्याला दिसून येईल की स्वामी विवेकानंदांनी क्रियाशील राहण्याचा संदेश दिला आहे. भूतकाळात घडून गेलेल्या वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता , वर्तमानात अधिकाधिक चांगले काम कसे करता येईल याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. बहुतांश सर्वच माणसे अपयशाची जबाबदारी स्वतःवर न घेता ,ते दुसऱ्यांना जबाबदार धरतात किंवा भाग्याला दोष देऊन मोकळे होतात.असे केल्याने प्रश्न सुटत नाहीतच आणि उत्त्तर न मिळाल्याने माणूस खचत जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात की ' उठा, बलवान व्हा आणि संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या.मनाला परत परत सांगा की तू स्वतः तुझे भविष्य बनवण्यासाठी सामर्थ्यवान आहेस. तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही घडत जाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजत असाल तर तुम्ही दुबळेच राहाल, आणि जर तुम्ही स्वतःला सामर्थ्यशाली समजाल तरच तुम्ही सामर्थ्यवान बनू शकाल. तरुणांच्या प्रगतीसाठी, तरुणांनी ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याविषयी मार्गदर्शन करताना विवेकानंदांनी दिलेला संदेश खरंच खूप प्रेरणादायी आहे. ते म्हणतात, " आयुष्यात एक ध्येय निश्चित करा, त्याविषयी चिंतन करा. तुमचा मेंदू, स्नायू, आणि इतर सर्व शरीर अवयव त्याच विचाराने भरून जावेत. हाच यशाचा मार्ग आहे " स्वतःचा उत्कर्ष साधण्याबरोबरच आपण समाजाची सेवा सुद्धा करायला हवी. कमीतकमी आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो तर दुसऱ्यांविषयी चांगले विचार करणे, जो चांगले करत आहे त्याला मदत करणे, सर्वजण समान आहेत आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाची सेवा करणे हेच माणसाचे अंतिम ध्येय असायला हवे असे स्वामीजींनी सांगितले.ते म्हणतात "काय फरक पडतो की मरणोत्तर स्वर्ग आहे का नरक? काय फरक पडतो की आत्मा आहे का नाही? हे आपल्यासमोर जग आहे आणि ते यातनांनी भरलेले आहे.म्हणूनच जग सुखी करण्याचा प्रयत्न सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसार केलाच पाहिजे.असे करत असताना मग काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या जाती , धर्म अथवा पंथाचे आहात. मानवता हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर नक्कीच सर्वांची प्रगती होईल." स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या विचारांचे आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला, तर नक्कीच आपली प्रगती होईल आणि राष्ट्रदेखील बलशाली होईल.